नाशिक: मालेगाव शहरात शैक्षणिक संस्थेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगाव महानगरपालिकेतील बीट मुकादम मनोहर ढिवरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. याच काळात शासकीय कार्यालयातील लाचखोरी उघड होत आहे.
तक्रारदाराने मालेगाव येथील प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालयातील अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाईसाठी महानगरपालिकेत अर्ज दिला होता. या अर्जानुसार वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मालेगाव महापालिकेतील बीट मुकादम मनोहर ढिवरे (४५) याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती पाच हजार रुपये ठरले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.
हेही वाचा… नाशिक: माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्याविरुध्द गुन्हा
लाचेची रक्कम स्वीकारत असताना ढिवरेला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.