जळगाव : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीशी मुक्ताईनगरात झालेल्या छेडछाड प्रकरणानंतर संशयित हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पदाधिकारी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नामोल्लेख न करता संशियत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे म्हटले होते. यानंतर आता या गुन्ह्यातील संशयितांपैकी काहीजण शिंदे गटात असल्याची पुष्टी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही दिली आहे.

मुक्ताईनगरातील कोथळी येथील यात्रेत काही टवाळखोरांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी रात्री छेड काढत सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली होती. त्यामुळे सात जणांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, दोन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणालाच अटक न केल्याने संतप्त केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी थेट पोलीस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारला. मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामाध्यमातून पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असल्याचा आणि त्यामुळेच मुलीच्या छेडछाडसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात विलंब केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही मुक्ताईनगरात अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असून, त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता.

दरम्यान, आमदार पाटील यांनी याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधला. आपल्यावरील वैयक्तिक आरोप फेटाळून छेडछाड प्रकरणातील पीयूष मोरे हा संशयित सध्या शिंदे गटात असला, तरी एकेकाळी तो भाजपमध्येही होता व नगरसेवक म्हणून निवडून आला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन वर्षांपूर्वी त्याने आमच्या पक्षात प्रवेश केला, असे सांगून त्याचे एकनाथ खडसे आणि मंत्री रक्षा खडसे यांच्याबरोबर असलेले छायाचित्र आपल्याकडे असल्याचा दावा पाटील यांनी केला. या गुन्ह्यातील कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कोणत्या पक्षाचा आहे, या विषयावर चर्चा करून जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा दोषींवर कठोर कायदेशीर कशी होईल यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

मुक्ताईनगरातील छेडछाड प्रकाराचा निषेध नोंदवला पाहिजे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना आधीच दिल्या आहेत. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

चंद्रकांत पाटील (आमदार, शिवसेना- एकनाथ शिंदे, मुक्ताईनगर)

Story img Loader