लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट झाले असून एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरीत सर्वाधिक प्रत्येकी १७ तर, कळवणमध्ये सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार असून काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिल्याने महायुती, महाविकास आघाडीसमोर त्यांचे आव्हान राहणार आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघातून सोमवारी १४१ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या १९६ वर आली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी प्रयत्न करूनही चांदवडमधून नाराज केदा आहेर यांनी माघार घेतली नाही. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात त्यांचे बंधू केदा आहेर आणि महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे प्रमुख उमेदवार आहेत. तशीच स्थिती नांदगावमध्ये आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांच्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त

पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे भुसे विरुध्द महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांच्या लढाईत बंडूकाका बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंत गिते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात मुख्य लढत आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. देवळालीत महायुतीत वेगळाच तिढा निर्माण झाला. पक्षाने उमेदवारी मागे घेण्याबाबत सादर केलेले पत्र तांत्रिक कारणास्तव ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम राहिली. या ठिकाणी महायुतीतीलच अहिरराव आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) सरोज अहिरे परस्परांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगेश घोलप आणि वंचितचे अविनाश शिंदे हेही रिंगणात आहेत.

येवल्यात महायुतीचे छगन भुजबळ, महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यासह १३ जण रिंगणात आहेत. निफाडमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम या आजी-माजी आमदारांमध्ये पारंपरिक लढत होणार आहे. कळवणमध्ये महायुतीचे नितीन पवार, महाविकास आघाडीचे जे. पी. गावित यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. बागलाणमध्ये महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण आणि महायुतीचे दिलीप बोरसे यांच्यासह १७ उमेदवार आहेत. इगतपुरीत महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित (अपक्ष) यांच्यासह १७ जण मैदानात आहेत. सिन्नरमध्ये महायुतीचे माणिक कोकाटे, महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्यासह १२ उमेदवार आहेत. अनेक जागांवर बंडखोर, अपक्षांची लक्षणीय संख्या असल्याने तिरंगी वा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-बंडखोरांना थोपविण्यासाठी नेत्यांची धावपळ, गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न

कळवणमध्ये सात उमेदवार

विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य, इगतपुरी व बागलाण या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी २१ तर, कळवण या राखीव मतदारसंघात सर्वात कमी सात उमेदवार रिंगणात आहेत. नांदगावमध्ये (१४), मालेगाव मध्य (१३), बागलाण (१७), चांदवड (१४), येवला (१३), सिन्नर (१२), निफाड (नऊ), दिंडोरी (१३), नाशिक मध्य (१०), नाशिक पूर्व (१३), नाशिक पश्चिम (१५), देवळाली (१२) आणि इगतपुरी (१७) असे जिल्ह्यात एकूण १५ मतदारसंघात १९६ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.