नाशिक – अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे विद्यार्थिनी मेटाकुटीला येतात. त्याचा परिणाम विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती आणि शैक्षणिक कामगिरीवर होतो. विद्यार्थिनींच्या शारीरिक वेदना कमी होण्यासह वर्गातील उपस्थिती कायम राहण्यासाठी वेदनाशामक बॅग हा रामबाण उपाय ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
हेही वाचा >>> उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
आदिवासी विकास विभागाकडून द मिलेनियम वेल्फेअर फाउंडेशनच्या मदतीने शासकीय आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘म होई ग बरी’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थिनींना मल्टीपर्पज इलेक्ट्रिक हॉट वॉटर जेल बॅग अर्थात वेदनाशामक बॅग (पेन रिलीफ) देण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेत या बॅगांचे वितरण गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपायुक्त विनिता सोनवणे, द मिलेनियम वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम झारिया, विनोद राठोड, सदिच्छादूत समीक्षा नन्नावरे, युएनडीपीचे लहू राठोड, सुभम झा, मुख्याध्यापक तनवीर जहांगीरदार, अधीक्षक संतोष सोनवणे, अधीक्षिका गौरीनंदा पाटील आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा >>> शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
‘म होई ग बरी’ उपक्रमाच्या माध्यमातून मासिक पाळी काळातील वेदना कमी करण्यासह खेळाच्या दुखापतींपासून आणि शारीरिक अस्वस्थतेपासून विद्यार्थिनींची मुक्तता करण्यावर भर दिला जात आहे. त्यामाध्यमातून राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ३७ एकलव्य निवासी शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या प्रवेशित विद्यार्थिनींसाठी मोफत सहा हजार १०० ‘पेन रिलीफ बॅग’ दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा सुमारे ५५ हजार विद्यार्थिनींना लाभ होणार आहे.
‘हेल्पलाईन’द्वारे समुपदेशन
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्याबाबत अनेक गैरसमज आहेत. या काळात विद्यार्थिनींना विविध समस्या भेडसावतात. त्या पार्श्वभूमीवर मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनासाठी टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे महिला डॉक्टर विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन व समुपदेशन करणार आहेत. ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे.
© The Indian Express (P) Ltd