‘मुंबई-नागपूर महासमृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता शेतजमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

या विषयावर शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्यासह माजी मंत्री तुकाराम दिघोळे, तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. मुंबई-नागपूर महासमृद्धी महामार्ग प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी आणि जुन्या रस्त्यावरून १० पदरी महामार्ग विकसित करावा, असे आमचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित महामार्ग प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील २६, तर इगतपुरीतील २२ गावांतील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. जमीन अधिग्रहित करण्यासाठी पूर्वकल्पनाही दिली गेलेली नाही. मोदी सरकारमधील काही मंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावेच्या गावे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पगार यांनी केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपपणे उभे राहून वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. घोटी-नागपूर महामार्गाचे रुंदीकरण करून याच मार्गावर तो प्रकल्प साकारल्यास विकासाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचा नाहक बळी जाणार नाही. सिन्नर, इगतपुरी तालुक्यात औद्योगिक प्रकल्पासाठी ६२५ एकर जमीन आधीच आरक्षित आहे. त्यात सिन्नर- इगतपुरी तालुक्यातील सुमारे २९३७.५ एकर बागायती जमीन अधिग्रहित करण्यात येणार असल्याने शेतकरी भूमिहीन होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी शांताराम ढोकणे, खंडेराव सानप, विजय आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, रामदास जायभावे आदी उपस्थित होते.