शहर बस सेवेचे दर जाहीर करत महापालिकेने प्रजासत्ताक दिनापासून पहिल्या टप्प्यात ५० बस सुरू करण्याची तयारी केली आहे. पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये तर पुढील प्रत्येक दोन किलोमिटरच्या टप्प्यासाठी अधिकचे पाच रुपये प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. महापालिकेच्या बसमधील प्रवास राज्य परिवहनच्या तुलनेत महाग आणि रिक्षाा भाडय़ाशी समकक्ष ठरणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेच्या बस सेवेत ज्येष्ठांना एसटी प्रमाणे निम्म्या दरात प्रवास करता येईल. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी हजारो विद्यार्थी बस सेवेचा वापर करतात. त्यांनाही सवलतीच्या दरात पास देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेली महापालिकेची बस सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात डिझेलवर चालणाऱ्या ५० मिनी बसद्वारे ही सेवा सुरू केली जाणार आहे. पंचवटीतून पाच तर नाशिकरोडहून चार अशा एकूण नऊ मार्गावर ही सेवा सुरू केली जाईल. महापालिकेच्या बस सेवेसाठी ‘सिटी लिंक नाशिक कनेक्ट’ हे नाव निश्चित झाले आहे. बस सेवेसाठी आकारल्या जाणाऱ्या भाडय़ावर बस कंपनीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पहिल्या दोन किलोमीटरसाठी महापालिकेच्या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तीला १० रुपये लागतील. दोन ते चार किलोमीटरच्या दरम्यान प्रवासासाठी १५ रुपये, चार ते सहा किलोमीटरसाठी २०, सहा ते आठ किलोमीटरसाठी २० आणि आठ ते दहा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी २५ रुपये यानुसार ते पुढे वाढत जाईल. एसटी प्रमाणेच १२ वर्षांखालील मुलांना प्रवासासाठी निम्मेच भाडे लागेल. तसेच ज्येष्ठांना शहरात देखील सवलतीच्या म्हणजे निम्म्या भाडय़ात प्रवास करता येईल. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महापालिकेच्या बस सेवेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधितांना एसटी प्रमाणे सवलतीच्या दरात पास उपलब्ध केले जाणार आहेत.
एसटीच्या शहर बस वाहतुकीनुसार भाडे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात महापालिकेची बस सेवा नागरिकांना काहिशी महागडी ठरणार असल्याचे दिसून येते. एसटी महामंडळ चार किलोमीटरला १० रुपये भाडे आकारते. महापालिकेच्या बसमधून प्रवास करताना दोन ते चार किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे असेल. याचा विचार केल्यास प्रत्येक चार किलोमीटरला नागरिकांना पाच रूपये अधिकचे द्यावे लागतील. भाडेतक्ता पाहिल्यास शेअर रिक्षात प्रवाशांना जे भाडे द्यावे लागते, तितकेच भाडे महापालिकेच्या बसमधून प्रवास करताना द्यावे लागणार आहे.
महापालिकेच्या बस सेवेसाठी नाशिकरोड आणि तपोवन येथे बस डेपो कार्यान्वित करण्यात येतील. तेथून नाशिकरोड ते पंचवटी, अंबड, पवननगर तसेच पंचवटी येथून नाशिकरोड, सिडको आणि सातपूर अशा महत्वाच्या नऊ मार्गावर सेवा दिली जाईल. बस सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार आहे. बस सेवेत २०० सीएनजी बस समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सीएनजी पंपाचे काम प्रगतीपथावर आहे.
एसटीच्या शहर बस सेवेप्रमाणे महापालिकेच्या बस सेवेतही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध केले जातील. अद्ययावत बस, या सेवेसाठी खास अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची बससेवा व्यावसायिक तत्वावर चालविण्याचे नियोजन आहे.
– कैलास जाधव (आयुक्त, महापालिका)