नाशिक – महानगरपालिका आयुक्त पदावर वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्याआधीच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. पुलकुंडवार यांची आता साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनपाच्या नवीन आयुक्तपदाची जबाबदारी कुणाला दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
डॉ. पुलकुंडवार यांच्या आधी मनपा आयुक्तपदी असणाऱ्या रमेश पवार यांची राज्यातील सत्तांतरानंतर अवघ्या काही महिन्यात उचलबांगडी करण्यात आली होती. डॉ. पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण, त्यांच्या कार्यपध्दतीवर भाजपचे स्थानिक नेते नाराज होते. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या होत्या. अकस्मात झालेल्या या बदलीस भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सुप्त संघर्षाची किनार असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात होत आहे.
मागील काही दिवसांपासून डॉ. पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्याच वेळी म्हणजे शुक्रवारी सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. मनपा आयुक्त पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून साखर आयुक्त, पणे या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. गतवर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र शिवसेना (शिंदे गट)- भाजप युतीच्या सरकारने राबविले गेले होते. त्यावेळी तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांची अवघ्या काही महिन्यांत बदली होऊन जुलैमध्ये या पदावर डॉ. पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली होती. निवडणुका लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. डॉ. पुलकुंडवार यांच्या हाती महापालिकेचा गाडा होता.
हेही वाचा >>>जळगाव : अबब… स्टेट बँक शाखेतील सोने चोरीचा आकडा साडेतीन कोटींवर
प्रशासकीय राजवटीतील कारभाराबद्दल भाजपमध्ये मतभिन्नता होती. एक गट समाधानी तर दुसरा नाराज होता. रखडलेले विविध प्रश्न, विकास कामे आणि अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने भाजप नेत्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली होती. शहरासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल, असे भाजपच्या काही नेत्यांनी म्हटले आहे. तर काहींनी प्रशासकीय राजवटीत कामे रखडल्याची तक्रार करीत नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तरे न मिळाल्यास जबाब दो आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्याचे सांगितले गेले होते. आयुक्त शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रभावाखाली काम करीत असल्याचा भाजप नेत्यांचा आक्षेप होता. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच झालेल्या बदलीमुळे राजकीय वर्तुळातून विविध दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.