नाशिक : महापालिकेने मार्चअखेरीस मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २५५ कोटींचा टप्पा गाठला. आजवरच्या इतिहासात ही विक्रमी वसुली आहे. गतवर्षी २०७ कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या वर्षात सुमारे ४८ कोटींची अधिक वसुली झाली.आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरीस म्हणजे शासकीय सुट्टीच्या दिवशीही केंद्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने मुदतीत कर भरण्यास प्राधान्य दिले. मालमत्ता कर वसुली २५५ कोटींवर पोहोचणार असल्याचे कर संकलन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त अजित निकत यांनी सांगितले.
मालमत्ता कर वसुलीत पहिल्यांदा हा टप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा मार्चअखेरपर्यंत २०७ कोटींची वसुली झाली होती. यंदा आजवरचे सर्व विक्रम मोडून लक्षणीय वसुली झाली. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन झाले होते. पुढील तीन महिन्यात सुमारे ५३ कोटींची वसुली झाली. अभय योजना, बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला गेल्याचे हे फलीत आहे.
अभय योजनेचा हातभार
शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून जवळपास ३५ कोटींची वसुली झाल्याचा अंदाज आहे.