नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्यासाठी वापरले जाणारे ट्रॅश स्किमर यंत्र चालविण्यासह त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने पुन्हा कोट्यवधींच्या खर्चाची तयारी केली आहे. या कामासाठी सुमारे सव्वा दोन कोटींच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोदावरीसह तिच्या उपनद्या स्वच्छ राखण्यासाठी शहरात सांडपाण्याच्या स्वतंत्र वाहिन्या, मलजलशुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण, नदीपात्रात कचरा, निर्माल्य टाकले जाऊ नये म्हणून दक्षता आदी प्रयत्न केले जातात, असा दावा गोदावरी संवर्धन विभागाकडून केला जातो. शहरातून वाहणाऱ्या गोदावरीत सांडपाणी मिसळत असल्याने पानवेली पसरतात. त्यामुळे काही भागात पात्रास हिरवेगार मैदानासारखे स्वरुप प्राप्त होते. गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्यास पानवेलींचे प्रमाण आपसूक कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, आजवर मूळ इलाजाऐवजी वरकरणी मलमपट्टी करण्यावर भर दिला गेल्याचे चित्र आहे.

गोदापात्रातील पानवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ट्रॅशस्किमर यंत्र खरेदी केले. कंपनीने पाच वर्षे ते चालविण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एका कंपनीवर सोपवली होती. मध्यंतरी हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिककडे हस्तांतरीत केले. आधीच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी उपरोक्त कामांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारीत हे यंत्र आहे. पुढील पाच वर्षे ते चालविणे आणि देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण दोन कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कुंभमेळ्यात गोदावरी स्वच्छता ऐरणीवर

दोन वर्षांनी गोदा काठावर सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने गोदावरी स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आला आहे. मलजलशुध्दीकरण केंद्रांची उभारणी आणि नुतनीकरणासाठी महापालिकेने चालना दिली आहे. त्यासाठी १३२५ कोटींची निविदा अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आली. ट्रॅश स्किमर यंत्राने आजवर गोदापात्र पूर्णपणे पानवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दृष्टीपथास पडलेले नाही. परंतु, त्यावरील खर्च मात्र कायम आहे.

Story img Loader