नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती.
अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली.
हेही वाचा…चोरीच्या दुचाकींची रंग बदलून विक्री, दोन संशयित ताब्यात
सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले.
हेही वाचा…टाकेहर्ष महिलांचे पाण्यासाठी आंदोलन
कारवाईत सातत्याचा अभाव
शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते.