नाशिक – महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत असताना मंगळवारी पहिल्यांदाच मनपा कर्मचाऱ्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर केला. या आरोपानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दोघांमध्ये चांगलीच जुंपली.

महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त डॉ. मयूर पाटील दर महिन्याला १० हजार रुपये तसेच बोंबील, मासे, ताजी फळे आणि भाजीपाला मागत असल्याचा आरोप सिडको विभागीय कार्यालयातील मनपा कर्मचारी राजेंद्र उगले यांनी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर थेट त्यांच्या दालनात केला. या आरोपानंतर उपायुक्त डॉ. पाटील देखील विभागीय कार्यालयात पोहोचले. त्याठिकाणी दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. उगले यांनी उपायुक्त पाटील यांच्यासमोरच माझ्याकडून भाजीपाला मागत होतात तसेच पैसेही घेत होतात, असे सुनावले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.