सिंहस्थातील चांगल्या कामाची दखल

आर्थिक अडचणींच्या फेऱ्यात सापडलेल्या नाशिक महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीत कोणतीही तोशीष भासू नये याची दक्षता घेत अखेर मंगळवारी १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त सिंहस्थातील चांगल्या कामाबद्दल ३८९ रुपये असे एकूण साडेतेरा हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहे. याचा लाभ सुमारे पाच हजार जणांना होणार आहे. गतवेळी सानुग्रह अनुदानाची रक्कम १३ हजार रुपये होती. परंतु त्यातील दोन हजार रुपये काही कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. यंदा त्यात समाधानकारक वाढ न झाल्यामुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सानुग्रह अनुदान जाहीर होत नसल्याने कर्मचारीवर्गात अस्वस्थता होती. जकातीपाठोपाठ स्थानिक संस्था करही रद्द झाल्यामुळे पालिका अडचणीत आली आहे. यामुळे या वर्षी या रकमेचे काय होणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. महापौर अशोक मुर्तडक यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. स्थानिक संस्था कर रद्द झाल्यामुळे पालिकेचे उत्पन्न २०० ते ३०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे आर्थिक स्थिती बेताची असतानाही पालिकेने कर्मचाऱ्यांची काळजी घेतल्याचे मुर्तडक यांनी नमूद केले. यंदा कर्मचाऱ्यांना १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि सिंहस्थात चांगले काम केल्याबद्दल ३८९ असे एकूण साडेतेरा हजार रुपये दिले जाणार आहेत. मानधनावर कार्यरत कर्मचारी, अंगणवाडी सेविका या सर्वाना सानुग्रह रकमेचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे पालिकेवर सुमारे दहा कोटींचा बोजा पडणार आहे.

 

 

Story img Loader