येथील पाथर्डी परिसरातील कचरा डेपोत गुरुवारी दुपारी आग लागल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. या धुरामुळे वाहनधारकांना त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
पाथर्डी परिसरात महापालिकेचे कचरा संकलन केंद्र आणि खत प्रकल्प आहे. कचरा संकलन केंद्रात दररोज शहर परिसरातून ३००-४०० क्विंटल कचरा संकलित होतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत बनविण्याचे काम प्रकल्पात केले जाते.
कचऱ्याचे थर वारंवार एकावर एक पडल्याने दाब निर्माण होऊन मिथेन वायूची निर्मिती होते. या मिथेनमुळे डेपोत कायम कचरा जाळला जात असल्याचे चित्र दिसते. गुरुवारी आगीचे लोळ दिसत असले तरी तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुपारनंतर आगीची तीव्रता वाढल्याने आजूबाजूचा कचरा त्याच्या कचाटय़ात सापडला.
स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. या दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा