लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव – शहरातील समतानगर भागात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत.
शहरातील समतानगर भागात जुन्या वादातून रविवारी सकाळी काही तरुणांसोबत अरुण सोनवणे (२८, रा. समतानगर, जळगाव) वाद झाला होता. तो काहींच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला होता. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा हा वाद उफाळून आला. काहींनी अरुण यास समतानगर भागातील वंजारी टेकडीवर बोलाविले. तो तेथे गेल्याची माहिती मिळताच, त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे यानेही धाव घेतली. मारेकरी अरुण आणि आशिष सोनवणे यांच्यावर चॉपर व कोयत्याने वार करत असल्याचे गोकुळला दिसले. गोकुळवरही हल्ला करण्यात आल्याने जखमी झाला.
आणखी वाचा-चांदोरीजवळ नाशिक-छत्रपती संभाजीनगर शिवशाही खाक, सर्व प्रवासी सुखरुप
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विठ्ठल पाटील, गुन्हे शोधपथकाचे संजय सपकाळे, सुशील चौधऱी, अतुल चौधरी आदींसह कर्मचार्यांनी धाव घेत पंचनामा केला. अरुण सोनवणेसह गोकुळ सोनवणे, आशिष सोनवणे यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती अरुण याला मृत घोषित केले. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी जखमींकडून घटनेची माहिती घेत संशयितांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली.