जळगाव – शहरातील गोलाणी व्यापारी संकुलात रविवारी रात्री तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. सोपान हटकर (३५, रा. हरिविठ्ठललनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरार संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर भागात सरलाबाई हटकर (४२) या वास्तव्याला आहेत. सरलाबाई हटकर या धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोपान हा त्यांचा मुलगा सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. रविवारी रात्री गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यावर गोविंदा झांबरे (रा. नाथवाडा, जळगाव), ज्ञानेश्वर लोंढे ऊर्फ नानू (रा. कंजरवाडा), राहुल भट (रा. खोटेनगर), करण सकट (रा. बी. जे. मार्केट, कोंडवाडा) हे गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यावर बसले होते. तेथे सोपान हटकर आला. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी ज्ञानेश्वर लोंढे याने रोहित भटजवळील धारदार शस्त्र हिसकावून घेत सोपान हटकरवर सपासप वार केले. त्यात सोपान हटकरचा मृत्यू झाला.
हेही वाचा – “तुमचा नेता म्हणजे भारत नाही, एवढा क्षुद्र…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक देवळे, शेवंगे, संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, अक्रम शेख, विजय पाटील, आश्रफ शेख, कमलाकर बागूल, संतोष मायकल, महेश महाजन यांनी धाव घेतली. गोलाणी व्यापारी संकुलाच्या मागील बाजूला अग्निशमन कार्यालयानजीक सोपान हटकरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. पोलिसांनी रात्रीच संशयितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोघांना अटक केली. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नेमकी घटना काय घडली, याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. इतर संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
हेही वाचा – “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट
सरलाबाई हटकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा सोपान याच्याकडे दुचाकी असून, ती हप्त्यावर घेतली आहे. तिचे हप्ते थकले होते, म्हणून शोरूमवाले ओढून घेऊन जातील, या भीतीने ती माझा भाऊ सुपडू पाटील (रा. रिंगणगाव, जि. जळगाव) यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी दुचाकी सोपानचे मित्र गोविंदा झांबरे (रा. नाथवाडा, जळगाव) व ज्ञानेश्वर लोंढे ऊर्फ नानू हे माझा भाऊ सुपडू पाटील यांच्या शेतातील खळ्यातून परस्पर घेऊन आले होते. तिचा ते वापर करीत होते. म्हणून सोपानला त्याचा राग आला होता. त्यांना दुचाकी का घेऊन आले, असा जाब विचारला. रविवारी दुपारी दुचाकी गोविंदा झांबरे व ज्ञानेश्वर लोंढे हे पारोळा येथे विवाह सोहळ्याला जाण्यासाठी घेऊन गेले होते, म्हणून सोपानने त्यांना दुचाकी घेऊन या, असे सांगत बोलाविले होते. ते गोलाणी व्यापारी संकुलात दुचाकी परत देणार होते, म्हणून सोपान हा रात्री आठच्या सुमारास गोलाणी संकुलात गेला होता. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास सोपानच्या दुचाकीच्या कारणावारून गोविंदा झांबरे, ज्ञानेश्वर लोंढे ऊर्फ नानू, राहुल भरत भट, करण सकट यांनी सोपानचा धारदार शस्त्राने खून केला. वाद झाला त्यावेळी सोपानचा मित्र शुभम परदेशी (रा. प्रजापतनगर), मुकेश लोंढे (रा. कंजरवाडा) हे तेथेच होते. त्यांनी सोपानला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहण करीत खून केल्याचा घटनाक्रम सांगितला. सरलाबाई हटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.