जळगाव : शहरासह जिल्ह्यातील हत्यासत्रांची मालिका अद्याप थांबलेली नाही. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्था धोक्यात आणणार्या घटना घडत असून, दीपावली पर्वात मंगळवारी रात्री शहरातील तांबापुरा भागात एका कुटुंबावर पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शहरातील तांबापुरा भागातील एका कुटुंबावर मंगळवारी रात्री टोळक्याने सशस्त्र हल्ला चढविला. यात संजयसिंग प्रदीपसिंग याच्या छातीत चाकूचा वर्मी घाव लागला. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात संजयसिंग याचे वडील प्रदीपसिंग यांच्यासह अन्य चार सदस्य जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल वंजारी यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
हेही वाचा :मतदारांशी संपर्क साधण्यासाठी फराळ, आकाशकंदील, पणत्यांचा वापर
तांबापुरा भागातील घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस पथकाने धाव घेत नियंत्रण मिळविले. रात्रीपासूनच पोलीस पथक घटनास्थळी ठाण मांडून आहे. नूतन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदभार घेऊन चार दिवस उलटत नाही, तोच खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले आहे. त्यांच्यापुढे हे खूनसत्र मोठे आव्हान आहे. शहरात खुनाचे सत्र थांबून महिना होत नाही, तोच पुन्हा दीपावली पर्वातच खून झाल्याने जळगावकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
हेही वाचा :जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणात एकनाथ खडसेंच्या कोंडीचा प्रयत्न
दरम्यान, जळगावसह जिल्ह्यात रोजच किरकोळ कारणावरून हाणामार्या होतात. गेल्या महिन्यांत तर हत्यासत्र तर आठ-आठ दिवसांत होत होते. शहरासह जिल्ह्यात होत असलेले हत्यासत्र, अघोषित संचारबंदी, टोळीयुद्ध, विनयभंग, छेडछाडीच्या घटना, महिलांसह मुलींवरील अत्याचार, वाळूमाफियांचे हल्ले असे प्रकार गेल्या आठ-दहा महिन्यांत अधिक वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.