सर्वाचे ‘मुरलीकाका’ प्रसिद्ध लेखक, रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन
‘शोध’ या आपल्या पहिल्याच कादंबरीने वाचकांना वेड लावणारे येथील ज्येष्ठ लेखक व निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, व्याख्याता आणि संघटक अशी चौफेर ओळख असलेले रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने २०१३ मध्ये कादंबरी लेखनासाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्तीचे प्रथम मानकरी मुरलीधर खैरनार ठरले. या शिष्यवृत्तीचा वापर करत त्यांनी लिहिलेल्या ‘शोध’ या कादंबरीचे जुलैमध्ये प्रकाशन झाले. ही कादंबरी इतकी लोकप्रिय ठरली की चारच महिन्यांत दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कादंबरी लिखाणाचा पुरस्कार देऊन त्यांना अलीकडेच गौरविण्यात आले होते. केवळ लेखक म्हणून नव्हे, तर उत्तम रंगकर्मी म्हणून ते प्रसिद्ध होते. चाहत्यांमध्ये ‘मुरलीकाका’ अशी त्यांची ओळख होती. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकांकिका’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकांकिका स्पर्धेत नाशिक केंद्रावरील अंतिम फेरीत परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उत्तम माहितीपट निर्माता, नाटय़ अभिनेता, दिग्दर्शक, व्याख्याता आणि कला संघटक म्हणून त्यांची कामगिरी नाशिककरांना परिचित आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी नाशिकची रंगभूमी गाजवली. १९७४ ते ९० हा काळ त्यांच्यासाठी त्या दृष्टीने अधिक महत्त्वपूर्ण ठरला. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी व्यावसायिक रंगभूमीकडे लक्ष पुरविले. नाशिकमधील कलाकारांच्या अभिनयाची धार संपूर्ण महाराष्ट्राला कळावी म्हणून त्यांनी संपूर्णपणे नाशिकच्या कलाकारांचा समावेश असलेले व्यावसायिक नाटक ‘गाढवाचं लग्न’ पुन्हा रंगभूमीवर आणले. या नाटकाचे संपूर्ण राज्यात २५० पेक्षा अधिक प्रयोग झाले. याशिवाय ‘शुभमंगल’, ‘अजब देशाची गजब गोष्ट’ यांसह इतर नाटकांचे १०० पेक्षा अधिक प्रयोग त्यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे सचिव म्हणून तसेच दीपक मंडळाशीही ते संबंधित होते. शेतकरी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणूनही ते काही वर्षे कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अॅड. मृणालिनी खैरनार, मुलगी अॅड. रुक्मिणी खैरनार या आहेत.
लेखक.. निर्माता.. दिग्दर्शक.. अभिनेता.. कुशल संघटक.. समाजकारणी अन् अजूनही बरेच काही. एखाद्या व्यक्तिमत्त्वास किती कंगोरे असावेत? एका पैलूचा अभ्यास करता दुसरा समोर येतो आणि दुसऱ्यावर मंथन होत नाही, तोच तिसरा. नाशिकचे दिवंगत ज्येष्ठ नाटय़कर्मी आणि ‘शोध’ या आपल्या पहिल्याच कादंबरीने वाचकांच्या मनात घर करणारे लेखक मुरलीधर खैरनार यांचे व्यक्तिमत्त्वच असे विलक्षण. ‘लोकसत्ता’च्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये आयोजित ‘लोकांकिका’ स्पर्धेत नाशिक केंद्रासाठी मुरलीकाका हे परीक्षक होते. यानिमित्ताने मुरलीकाका आणि ‘लोकसत्ता’चे स्नेहबंध चांगलेच घट्ट झाले होते. त्याविषयी थोडंसं.
लोकांकिका स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीसाठी परीक्षकांची निवड करताना नाटय़ क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून एक नाव पुढे आले ते म्हणजे मुरलीधर खैरनार. नाटय़ क्षेत्रात दुसऱ्याविषयी सहसा फारसा विश्वास दाखवला जात नाही. असे असताना अनेक जणांकडून एक नाव सुचविले जात असेल तर त्या नावात निश्चितच विलक्षण जादू असली पाहिजे हे लक्षात आले. तब्येत साथ देत नसतानाही अंगात नाटय़ऊर्जा सळसळणाऱ्या मुरलीकाकांनी लोकांकिकासारख्या स्पर्धेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत असल्याचे लक्षात घेत आणि या स्पर्धेतूनच नाशिकचे नाव नाटय़-चित्र क्षेत्रात चमकविणारे तारे मिळणार असल्याचे ध्यानी घेऊन परीक्षणासाठी येण्याचे मान्य केले. महाकवी कालिदास कलामंदिराच्या रंगमंचावर लोकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगात येत असताना मुरलीकाकांच्या अनुभवी नजरेतून अशा काही विलक्षण गोष्टी टिपल्या जात होत्या की, वाटावे या माणसाला गुण देण्यासाठी कागद आणि पेनची गरजच काय. विशेष म्हणजे परीक्षकांपैकी एक असलेले अंशु सिंग यांनी आपल्या रंगभूमी कारकीर्दीची सुरुवात मुरलीकाकांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू केलेली असल्याने गुरू-शिष्य अशी परीक्षकांची एक आगळी जोडी या स्पर्धेला लाभली होती. स्पर्धेनंतर अवघ्या काही मिनिटांत तिघा परीक्षकांनी निकाल तयार केला. अर्थातच हा सर्व चाणाक्ष नजर, अनुभव आणि अभ्यास यांचा खेळ होय.
निकाल जाहीर झाल्यानंतर स्पर्धकांनी मुरलीकाकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतली. त्या वेळी चुकीबद्दल स्पर्धकांना फटकारतानाच ते नाउमेद होऊ नयेत म्हणून गोंजारण्याच्या त्यांच्या अद्भुत स्वभावगुणाचे दर्शन झाले. नाशिकची रंगभूमी गाजविणारे एक व्यक्तिमत्त्व जेव्हा आपल्या अनुभवाचे बोल नवोदितांना ऐकवीत होते, तेव्हा ते आपल्या कानात साठविण्यासाठी अंशु सिंग यांसह पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जोगळेकर हेही स्तब्ध झाले होते. उपस्थित नवोदितांना खैरनार यांच्यासारखी चिकाटी आणि अभ्यास करण्याचा सल्लाही जोगळेकरांनी दिला. आता पुन्हा मुरलीकाकांकडून असे अनुभवाचे बोल ऐकावयास मिळणार नाहीत, याची रुखरुख सर्वानाच आहे.
परीक्षणासाठी सर्वप्रथम मुरलीकाकांकडे विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या तब्येतीविषयी कळल्यावर परीक्षणाचे जाऊ द्या, पण आधी तब्येत सांभाळा, असे त्यांना सुचविण्यात आले. तेव्हा त्यांनी ‘अरे, रंगमंच आणि प्रेक्षक हे माझे टॉनिक आहेत. त्यांचे दर्शन होताच आजार कुठल्या कुठे पळून जाईल’ असे ठणकावले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजार कुठल्या कुठे पळाला असता तर किती बरे झाले असते. पण तसे झाले नाही. तो पळाला अन् पुन्हा आला. मुरलीकाकांवर प्रेम करणाऱ्यांना रडविण्यासाठी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा