सोमवारी विशेष कार्यक्रम

नाशिक : थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगग्रस्तांमधील कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी डॉ. विकास आमटे यांनी निर्मिती केलेल्या ‘स्वरानंदवन’ या संगीत समूहाने वेगळाच नावलौकिक मिळविला आहे. ‘स्वरानंदवन’मधील कुष्ठरोगग्रस्त आणि अपंग कलाकारांनी एड्सग्रस्त मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अनाथ आणि एड्सबाधित मुलांसाठी काम करणाऱ्या दत्ता बारगजे यांच्या ‘इन्फन्ट इंडिया’ (पाली) या संस्थेच्या मदतीसाठी येत्या ७ जानेवारी रोजी डॉ. विकास आमटे दिग्दर्शित ‘स्वरानंदवन’चा प्रयोग होणार आहे.

दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा प्रयोग होणार असल्याची माहिती बुधवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘स्वरानंदवन’ केवळ वाद्यवृंद नव्हे, तर कुष्ठरोगग्रस्त आणि अपंग व्यक्तींनी सुरू केलेला पहिला संगीत समूह आहे. रसिकांच्या समर्थनामुळे १५ वर्षांत ‘स्वरानंदवन’चे हजारो प्रयोग देशाच्या अनेक भागांत झाले. कार्यक्रमात अपंग कलाकार व्हीलचेअरवर बसून आपल्यातील कलेचे दर्शन घडवितात.अनाथ आणि एड्सबाधित मुलांसाठी इन्फन्ट इंडिया ही संस्था चालविणारे दत्ता बारगजे हे १९९८ ते २००२ पर्यंत गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड येथे शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.

भामरागडपासून दोन किलोमीटरवर असलेल्या डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाशी त्यांचा नेहमीचा संपर्क होता. त्यामुळे त्यांनी २००६ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजाने नाकारलेल्या एड्सग्रस्तांच्या कार्यासाठी बीड जिल्ह्य़ातील पाली येथे इन्फन्ट इंडिया संस्थेची स्थापना केली. ही संस्था एड्स रुग्णांच्या उपचारासाठी ‘आनंदवन’, त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘नवजीवन’ आणि एड्सग्रस्त महिला तसेच विधवांसाठी ‘आधार महिलाश्रम’ असे प्रकल्प सध्या राबवीत आहे.

संस्था कोणतेही सरकारी अनुदान घेत नसल्याने सध्या आर्थिक अडचणीत असून त्यांच्या मदतीसाठी आनंदवन- स्वरानंदवनचे कलाकार धावून आले आहेत. नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका भगवती हॉस्पिटल, मुंबई नाका, जहागीरदार बेकर्स, कालिदास कलामंदिर, ज्योती ग्रंथदालन, रेडक्रॉस, निर्माण हाऊस (कॉलेज रोड), इंडियन क्लासिक्स (संभाजी चौक) या ठिकाणी उपलब्ध आहेत. नाशिककरांनी या कार्यक्रमास मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader