आरती अंकलीकर-टिकेकर, पं. रघुनंदन पणशीकर, पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची मैफल
दीपावलीनिमित्त विविध रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे, तो दिवाळी पाडवा आणि या कालावधीत आयोजित मैफलींनी. नेहमीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमांसाठी विविध सार्वजनिक मंडळे, संस्था व संघटनांनी पुढाकार घेतल्याने ही पहाट खऱ्या अर्थाने सूरमयी बनणार आहे. दिवाळीतील पाडवा पहाट आणि संगीताची मैफल हे गेल्या काही वर्षांत अतूट बनलेले नाते यंदा अधिक दृढ होणार आहे. यंदा कलाप्रेमींना आरती अंकलीकर-टिकेकर, पं. रघुनंदन पणशीकर, पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या सुरावटीचा आविष्कार अनुभवण्यास मिळणार आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या संस्कृती नाशिक संस्थेतर्फे नेहरू चौक येथील पिंपळपारावर गुरुवारी पहाटे पाच वाजता ब्रह्मवृंदाच्या जयघोषात मैफलीला सुरुवात होईल. शास्त्रीय संगीतावर आधारित ‘पाडवा-पहाट’ अंतर्गत शास्त्रीय गायक पंडित कृष्णेंद्र वाडीकर (धारवाड) यांची मैफल सजणार आहे. त्यांना नितीन वारे (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज) व अमित भालेराव (तालवाद्य) संगीत साथ करतील. संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे यांनी हा योग जुळवून आणला आहे.
मैफलीनंतर ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांना ‘संस्कृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सिंहस्थाच्या क्षणचित्रांचे प्रदर्शन मांडले जाणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.
आ. प्रा. देवयानी फरांदे व भाजपचे प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे यांच्या पुढाकारातून भाऊबीज पहाट आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गंधाळलेल्या स्वरांनी सजणार आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात ही मैफल रंगणार आहे. मैफलीस कलाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आ. फरांदे यांनी केले आहे. नसती उठाठेव मित्रपरिवाराच्या वतीने लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता आयोजित दीपावली पहाट कार्यक्रमात पं. वसंतराव कुलकर्णी व किशोरीताई अमोणकर यांचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकरण यांच्या स्वराविष्काराची स्वर्गीय अनुभती मिळेल. त्यांना पुणे येथील पांडुरंग पवार (तबला), पं. सुभाष दसककर (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), रवींद्र पंडित (मंजिरा) संगीतसाथ करतील. आकाशवाणी केंद्राजवळील श्रीहनुमान मंदिर येथे ही मैफल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा