महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आणि आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर येथे माहीन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लीम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा झाला.
द्वारका येथील कथडा परिसरात काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम. एम. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. अशा सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या शेख हनिफ बशीरसारख्या नि:स्पृह अशा समाजसेवकांची मुस्लीम समाजाला गरज असल्याचे या वेळी शेख यांनी सांगितले. मान्यवरांच्या उपस्थितीत पाच जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. निकाहाचा विधी हाजी मुख्तार अशरफी यांनी केला. हिसामोद्दीन अशरफी यांनी या वेळी राज्यातील टंचाई दूर होण्यासाठी दुवा पठण केले. या विवाह सोहळ्यास पाच हजारपेक्षा अधिक जण उपस्थित होते. वधू-वरांना संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शेख आणि संयोजक शेख हनिफ बशीर यांनी बडेजाव मिरवून पाल्यांच्या विवाहासाठी कर्ज काढण्याच्या पद्धतीस फाटा देण्यासाठी येत्या काळात १०१ वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा करणार असल्याचा संकल्प केला. समाजातील गरीब तसेच श्रीमंतांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे व आर्थिक मदतीचे आवाहन या वेळी करण्यात आले. व्यासपीठावर राज्यमंत्री इब्राहीम भाईजान, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, हाजी मुजद्दिन शेख, माजी नगरसेविका हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदेश सचिव जावेद इब्राहीम यांनी केले. शेख हनिफ बशीर यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा