जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरून भोईटे आणि पाटील गटांत वाद सुरू आहे. या प्रकरणात दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या गुन्ह्यातील संजय पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील दीक्षितवाडी भागातील राहत्या घरातून अटक केली.
हेही वाचा >>>धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा
जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचा जून २०१८ मध्ये ताबा घेण्यावरून पोलिसांनी दोन्ही गटांना संस्थेच्या कार्यालयात जाण्यास मनाई केली होती. तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशावरून पाटील गटाने संस्थेच्या कार्यालयात ताबा घेत कामकाज सुरू केले होते. यावरून भोईटे गटाने १९ जून २०१८ रोजी आक्षेप घेतला होता. नूतन मराठा महाविद्यालयासमोर दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर भिडले होते. यात हल्लेखोरांनी गज, हॉकी स्टिक, लाठ्याकाठ्यांचा वापर करीत तक्रारदारासह साक्षीदारांना मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. तसेच दगडफेकही झाली होती. याप्रकरणी सुनील भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सुमारे २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पैकी १२ जणांना अटक झाली होती.
हेही वाचा >>>जळगाव: शिंदखेड्यातील भूमी अभिलेख लिपिक लाच घेताना जाळ्यात
उर्वरित पाच संशयितांपैकी बापू चव्हाण, चंद्रकांत पाटील घटनेवेळी नसल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक झाली नव्हती. पीयूष पाटील आणि भूषण पाटील हे त्या दिवशी बाहेरगावी असल्याने त्यांची नावे वगळण्यात आली होती. या गुन्ह्यातील संशयित संजय पाटील याला संशयित म्हणून स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी अटक केली.