नाशिक : अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. याअंतर्गत संस्थेत नव्याने काही उपकरणे दाखल झाली असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, विद्यापीठाशी संबंधित अभ्यास याची माहिती ब्रेल लिपीच्या माध्यमातून मिळत असून अन्य काही संदर्भ ग्रंथ वाचण्याची व्यवस्था उपकरणाच्या सहाय्यातून करण्यात आली आहे.
नॅब संस्थेच्या वतीने अंध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. संस्थेत सध्या २०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय स्तरावर काही अंशी ब्रेल लिपीमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध असते. परंतु, महाविद्यालयीन स्तरावर अभ्यास करताना वेगवेगळ्या अडचणी येतात. या अडचणींचा विचार करता संस्थेच्या वतीने ब्रेल प्रिंटर उपकरण आणण्यात आले आहे. यामध्ये कुठल्याही भाषेतील साहित्य हे ब्रेल लिपीत भाषांतरीत होते. या सुविधेचा लाभ स्पर्धा परीक्षा, विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी घेत आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब्रेलमध्ये लिखित साहित्य मिळत आहे.
हेही वाचा…नाशिक : निफाड तालुक्यात गोदावरीला पानवेलींचा विळखा
याशिवाय किबो या उपकरणाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, बंगाली, पंजाबी, गुजराथी यासह २७ भाषांमधील साहित्य ब्रेलमध्ये वाचण्याची व्यवस्था झाली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मदत होत असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होत आहे. ही सर्व व्यवस्था विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.