शेती सन्मान पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आपणास राग आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करणे हा खरे तर गुन्हा आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची परिस्थिती येऊ नये म्हणून नाम फाऊंडेशन प्रयत्नशील असेल. शेती आणि शेतकऱ्यांच्या संवर्धनासाठी सर्वानी एकत्रितपणे व्यापक दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. फिनोलेक्स पाइप्स आणि एबीपी माझा वृत्त वाहिनी यांच्या वतीने शनिवारी शेती उद्योगातील कर्तबगार व्यक्तींना शेती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पाटेकर यांच्यासह जलपुरुष राजेंद्र सिंह, अभिनेता मकरंद अनासपुरे, नामचे अरविंद जगताप, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे विक्री व विपणन विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी उपस्थित होते. लेमकेन, महिंद्रा फायनान्स साहाय्यक प्रायोजक असलेल्या या सोहळ्याचे दै. ‘लोकसत्ता’ प्रिंट पार्टनर आहेत. पुरस्काराचे यंदा हे दुसरे वर्ष. पुरस्कार्थीमध्ये कृषी क्षेत्रात अभिनव प्रयोग, शेतीपूरक उद्योगात उल्लेखनीय कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीला नवी दिशा देणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. नारायणराव देशपांडे (सांगली), दादाजी खोब्रागडे (चंद्रपूर), प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर), वैजनाथ कराड (बीड), डॉ. सी. डी. माई (मुंबई), मजिद पठाण (पुणे), कैलास पाटील (उस्मानाबाद), शोभा वाणी (जळगाव) आणि रणजित खानविलकर (रत्नागिरी) यांना मान्यवरांच्या हस्ते शेती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाटेकर यांनी महाराष्ट्रापुरता विचार न करता देशपातळीवर हे काम नेऊन शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. राजेंद्र सिंह यांनी घामावर प्रेम करणारी माणसे मोठी होतात, असे सांगत शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांच्यात आशेचा किरण जागवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

संशोधनाला वाव मिळायला हवा
अनासपुरे यांनी लोकसहभागातून शेतीचे प्रश्न सोडवणे शक्य असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गटशेतीचे प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. देशात कोरडवाहू जमिनीचे प्रमाण अधिक असले तरी कृषी विद्यापीठांची संख्या मात्र मोजकीच आहे. कृषीवर आधारित संशोधनाला वाव मिळायला हवा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader