‘नाम’ची ८८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत
सभोवतालची भीषण परिस्थिती आणि दुष्काळामुळे होणारे स्थलांतर पाहिले की ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ पेक्षा येथील ‘मुले इथेच अडवा आणि जिरवा’, असे काही उपक्रम राबविले गेले पाहिजेत, असे वाटते. नव्या पिढीने नवे तंत्रज्ञान आत्मसात करीत आधुनिक शेती करायला हवी. सरकार बदलत राहते. कोण चूक कोण बरोबर याची मीमांसा करण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल, हा विचार आणि तशी कृती महत्त्वाची आहे. ‘नाम’च्या माध्यमातून त्या दिशेने प्रयत्न सुरू असून एक मॉडेल तयार झाल्यावर वेळ आली की, प्रसंगी सरकारलाही जाब विचारला जाईल, असे खडे बोल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सुनावले.
शंकराचार्य संकुलात ‘नाम’ फाऊंडेशनतर्फे आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांच्या वारसदारांना शुक्रवारी आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. यावेळी पाटेकर यांच्यासह अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. ‘नाम’कडे विविध माध्यमांतून २३ कोटी रुपये जमा झाले असून त्यात जलसंवर्धन, सामूहिक विवाह सोहळा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय सेवा सुविधा यासह महिलांना शिवणयंत्र वाटप कार्यक्रम सुरू आहे. जलसंवर्धनाचे काम करण्यासाठी खोदकामाच्या यंत्रणेची आवश्यकता असून दानशूरांनी ते उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही पाटेकर यांनी केले.
कर्ज, आजारपण, खते बियाणे या पलीकडे जात शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला आणि त्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा मला राग आहे. पण त्या कुटुंबाला आधार देण्याचे सामाजिक भान प्रत्येकाने जपले पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दाह आहे तो वणवा होण्याच्या आत राजकारण्यांनी योग्य ती पावले उचलण्याची गरज असल्याचेही पाटेकर म्हणाले.
अनासपुरे यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या नावे काही समाजविघातक प्रवृत्तींकडून होणाऱ्या फसवणुकीकडे लक्ष वेधले. राज्यातील सोलापूर आणि नगर या जिल्ह्यात मदत देणे बाकी आह, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील शैक्षणिक वैद्यकीय संस्थांनीही यावेळी मदतीची तयारी दर्शविली. मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी वैद्यकीय सेवा, जनशिक्षण संस्थेत मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्याचे पालकत्व स्वीकारले. नाईक शिक्षण संस्थेने १० मुले दत्तक घेऊन त्यांची इयत्ता १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
मी कोणत्याही पक्षाचा नाही. फडणवीसांबद्दल एकदा मी चांगले बोललो, तर नाना ब्राह्मण समाजाचा, असे लोक म्हणू लागले. मी कलावंताच्या जातीचा आहे. भूमिकेनुसार माझी जात आणि धर्म बदलत राहतो.
– नाना पाटेकर

Story img Loader