नाशिक : नांदगाव मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष बाळू उर्फ बाळासाहेब बोरकर यांना माघार घेण्यासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नांदगाव तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे यांनी धमकी दिल्याप्रकरणी बोरकर यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या धमकीमुळे बोरकर यांनी माघार घेतली. नांदगाव मतदार संघात बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पण, शिंदे गटाचे नांदगाव तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे यांनी धमकी दिल्यामुळे आपणास माघार घ्यावी लागली. गिडगे, आमदार सुहास कांदे यांचे नाव घेऊन वारंवार जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. रविवारी या धमकीमुळे माघार घेतल्याचे बोरकर यांनी म्हटले आहे. आपण वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष होतो. नांदगाव विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा देत अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, गिडगे यांच्या धमक्यांमुळे माघार घ्यावी लागली.
हेही वाचा : नाशिकमध्ये जिथे तुतारी तिथे पिपाणीसदृश ट्रम्पेट बंडखोर, नामसाधर्म्यांना अनोखे चिन्ह
माघारीनंतर प्रचंड दबाव आहे. आपणास आणि कुटूंबियांना गिडगेपासून धोका आहे. त्यामुळे काही विचित्र घडल्यास, घातपात झाल्यास त्याला साईनाथ गिडगे आणि त्याच्या बरोबरचे साथीदार जबाबदार राहतील. ते खोटेनाटे आरोप करुन गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची दखल निवडणूक प्रशासन व पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी बोरकर यांनी केली आहे. नांदगाव मतदार संघाची निवडणूक धमकी, आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले होते.