नाशिक : करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले  नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य शुक्रवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. थंडीची तीव्रता कमी अधिक होत असताना देश विदेशातील पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली असून अभयारण्य पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे गजबजले आहे. करोना महामारीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अभयारण्य बंद होते.

माणसांची वर्दळ पूर्णपणे थांबल्याचा परिणाम पक्ष्यांचा किलबिलाट वाढण्यात झाला. पक्ष्यांना हक्काची शांतता मिळाली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर देशविदेशातील पक्ष्यांनीही अभयारण्य परिसरात हजेरी लावण्यास सुरुवात के ली आहे. सध्या १० हजारांहून अधिक पक्ष्यांचा मुक्काम असून पुढील महिन्यात पक्ष्यांची संख्या अधिक वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शासनाच्या निर्णयानुसार अभयारण्य खुले होत आहे. पर्यटकांनी सामाजिक अंतर नियमांचे पालन, मुखपट्टीचा वापर हे पथ्य बंधनकारक आहे. पर्यटकांनी सोबत सॅनिटायझर ठेवावे, पर्यटकांचे थर्मल स्क्रि निंग होणार असून यामध्ये ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ही ९५ पेक्षा कमी तसेच तापमान ३८ अंश सेल्सियस ते १००.४ पेक्षा जास्त असेल, त्यांना अभयारण्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. करोनासदृश लक्षणे आढळल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिला आहे.

Story img Loader