Nandurbar Crime : गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भागातून महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत. काही दिवासांपूर्वी बदलापूरमध्ये शाळेतील एका कर्मचाऱ्याने चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण पुढे आलं होतं. असाच काहीसा प्रकार आता नंदुरबारमध्ये घडला आहे.
अश्लिल व्हिडीओ दाखवून केला विनयभंग
एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नंदुरबारमधील एका शाळेतील एका ५० वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. सफाई कर्मचाऱ्या मोबाईलमधील इंटरनेट सुरू करून दे असं सांगत तिला अश्लिल व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – नंदुरबार जिल्हा परिषदेतील ७२ जणांविरुध्द कारवाई, कथीत अपंग युनिट घोटाळा
पालकांकडून पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर मुलीने घरी गेल्यानंतर पालकांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला तसेच याप्रकरणी संबंधित सफाईकर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपीला अटक
दरम्यान, मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदूरबार पोलिसांनी आरोपी सपाई कर्मचाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे, अशी नंदुरबारचे पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी दिली. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd