लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: पोलिसांची वर्षभराची मेहनत आणि जनजागृतीनंतर नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त घोषित करण्यात आला आहे. अंमली पदार्थ मुक्त घोषित होणारा नंदुरबार हा राज्यातील पहिलाच जिल्हा असणार आहे.
नंदुरबार पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात जवळपास १० हजार विद्यार्थी आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात नंदुरबार अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.
आणखी वाचा-Talathi Bharti: कॉपीप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी
वर्षभरापासून पोलिसांनी अंमलीपदार्थ मुक्त जिल्हा होण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींमध्ये अंमलीपदार्थ मुक्ती साठी खास ठराव देखील करण्यात आले होते. भावी पिढीसाठी पोलिसांनी राबविलेली जिल्हा अंमली पदार्थमुक्तची मोहीम निश्चित मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी व्यक्त केला. नंदुरबार पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याचा मानस असून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आता एकही अंमली पदार्थ विक्री-खरेदी, प्रचार, प्रसार होत नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.