नंदुरबार – जिल्ह्यातील वस्त्रोद्योग, कृषी प्रक्रिया आधारित उद्योग आणि इतर स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करून अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पोर्टल तयार करण्याचे ठरविले आहे. या पोर्टलद्वारे उद्योजक आपले प्रश्न व अडचणी थेट नोंदवू शकतील, आणि त्या प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर तत्काळ सोडवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषद-२०२५ झाली, परिषदेत उद्योग सहसंचालक (नाशिक विभाग) वृषाली सोने, मैत्री कक्षाचे प्रतिनिधी किशोर चव्हाण, नाशिक विभागाचे सिडबी प्रतिनिधी शंतनू श्रीवास्तव,, मुंबई मैत्री कक्षाचे स्वप्नील केंद्रे, निर्यात समन्वयक सूरज जाधव, तसेच अपेडा, मुंबई येथून ऑनलाईन मार्गदर्शन करणाऱ्या प्रणिता चौरे यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा प्रशासन विपणन सुविधा, विक्री यंत्रणा आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांसाठी टेस्टिंग प्रयोगशाळा उभारणार आहे. या माध्यमातून बचतगट व स्थानिक उत्पादक यांना त्यांच्या उत्पादनांचे गुणवत्तेचे मूल्यांकन करता येईल. नवीन उद्योगांना भालेर औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व सोई-सुविधा तसेच शहादा येथे नवीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळसाठी भूखंड अधिग्रहीत करण्याचे काम सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्याची अतिदुर्गम व आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसून अतिविकसीत नंदुरबार अशी ओळख निर्माण करण्याच्या मानस त्यांनी व्यक्त केला.
उद्योग सहसंचालक वृषाली सोने यांनी नंदुरबार जिल्ह्यात वस्त्रोद्योग ,तसेच मिरची पावडर उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
गुंतवणूक परिषदेत ८८ उद्योगांशी सामंजस्य करार
नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८८ उद्योग घटकांशी एकूण रु. २५९१ कोटींचे गुंतवणूक आणि ३३२५ रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू होतील, रोजगाराच्या संधी वाढतील, निर्यातीत वाढ होईल आणि गावांतील लोकांचे शहरांकडे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. या परिषदेमध्ये वस्त्रोद्योग, मिरची प्रक्रिया, कृषी प्रक्रिया आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याचा आर्थिक विकास वेगाने होण्याची शक्यता आहे.