लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार: मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ २६ जुलै रोजी जिल्हा बंद करण्याची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राजकीय गटतट विसरुन जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना याप्रश्नी एक झाल्या असून राज्यात मणिपूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ बंदची हाक देणारा नंदुरबार हा पहिलाच जिल्हा असणार आहे.
आणखी वाचा-रेल्वेचे वेळापत्रक अजूनही विस्कळीत
मणिपूरमधील महिला अत्याचाराचा सर्वच स्तरावरुन निषेध नोंदविला जात असताना आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नंदुरबारमध्ये यासंदर्भात दोन दिवसांपासून विविध सामाजिक संघटनांकडून बैठकांचे सत्र सुरु होते. या बैठकांमधून एकमताने जिल्हा बंद करण्याविषयी ठरविण्यात आले. मणिपूर, मध्यप्रदेश, राजस्थानमधील घटनांसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खासगी वसतिगृहातील आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर नाचण्यास सांगणे, ही सर्वच कृत्ये अमानवीय आहेत. याच विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सोमवारी समस्त आदिवासी समुदायाच्या वतीने जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना बंदविषयी निवेदन देण्यात आले. व्यापाऱ्यांनाही संघटनांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.