नाशिक – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बुधावल येथे परिचारिकेच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पैसे देण्याचे नाकारल्याचा राग आल्याने पतीनेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
तळोदा तालुक्यातील नळगव्हाण शिवारात सोमवारी सकाळी १० वाजता वंदना वळवी (३२) या परिचारिकेचा मृतदेह नदीकिनारी आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या प्रकरणाचा उलगडा केला. पती राकेश वळवी यानेच वादातून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. राकेशवर तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जानेवारी रोजी वंदना वळवी यांनी मुलाला आईकडे सोडून पती राकेशबरोबर शेतात जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी चार वाजेच्या सुमारास वंदनाची आई आणि मुलाने शेतात जाऊन चौकशी केली असता राकेशने वंदना रिक्षाने घरी गेल्याचे सांगितले. मात्र, सत्य वेगळे होते. राकेश कोणतेही काम न करता सतत वंदनाकडून पैसे मागत असे. पैसे देण्यास वंदनाने नकार दिल्याने त्याने संतापून कुदळीने तिच्या डोक्यावर वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर राकेशने तिचा मृतदेह नदीकिनारी फेकून दिला. आणि वंदना अचानक गायब झाल्याचा बनाव रचला. १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्थानिकांनी नदीकिनारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा – नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
हेही वाचा – बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक महेश निकम यांच्यासह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला. आणि वंदनाचा पती राकेश याच्यावर त्यांना संशय आला. चौकशीत राकेशने हत्येची कबुली दिली. वंदना वळवी बुधावल प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. पतीच्या सततच्या पैसे मागण्याच्या सवयींमुळे पती-पत्नीमध्ये कायम वाद होत असत. वंदनाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात राकेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार हे करत आहेत.