नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद येथे दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येऊन महिलांच्या प्रयत्नांना यश आले. आडवी बाटली या चिन्हास म्हणजेच दारुबंदीच्या बाजूने कौल मिळाल्याने महिलांनी एकच जल्लोष केला. दारुबंदीसाठी आवश्यक संख्याबळापेक्षा अवघी तीन मते अधिक पडली असली तरी महिलांसह दारुबंदी करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे हे यश मानले जात आहे. मतमोजणी अहवालानंतर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील असलोद गावात दारुड्यांचा उपद्रव, गावातील व्यसनाधीन तरुणांचे वाढते मृत्यू, संसारात निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे गावात दारुबंदी व्हावी, असा आग्रह गावातील काही कार्यकर्त्यांनी धरला होता. गाव परिसरात सुरु झालेली दारुची दुकाने चुकीच्या कागदपत्रांमुळे सुरु असल्याचा दावा करुन गावात दारुबंदीसाठी मतदानाची मागणी करणारा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक अधिसूचना काढून गावात रविवारी मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया राबवली. गावात १२१६ महिला मतदार असल्याने दारुबंदीसाठी ५० टक्क्याहून अधिक म्हणजे ६०९ महिलांचे आडव्या बाटलीला मतदान आवश्यक होते. मतदान प्रक्रियेत ६७७ महिलांनी मतदान केले. उभ्या बाटलीला ४९ मते मिळाली. १६ मते बाद झाली. आडव्या बाटलीला ६१२ मते मिळाली.
हेही वाचा : १५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक
आवश्यक आकड्यापेक्षा तीन मते जास्तीची मिळाल्याने दारुबंदीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय असून या निकालानंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला. या मतदान प्रक्रियेसाठी तहसीलदार दीपक गिरासे हे कर्मचाऱ्यांसह तळ ठोकून होते. शहाद्याचे प्रभारी पोलीस अधिकारी राजन मोरे यांनी बंदोबस्त तैनात केला होता. मतदानाबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर दारुबंदीबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. निकालानंतर गावकऱ्यांनी गुडीशेव वाटून आनंद व्यक्त केला. मतदानासाठी महिलांनी मतपत्रिकेवर दाखवलेली तत्परता आणि जिल्ह्यात अनेक वर्षांनी आडवी बाटली करण्यासाठी राबविण्यात आलेली मतदान प्रक्रिया यामुळे असलोद गावातील या दारुबंदीच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या