नंदुरबार – नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याला सक्षम व तंत्रसुसज्ज आरोग्य सेवा देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आरोग्य विभागातील सर्वांनी आपल्या कामात सेवाभाव ठेवून कर्तव्यपरायणतेने काम करणे गरजेचे आहे. त्यातूनच जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन भवनमधील सभागृहात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून तीन दिवसीय ‘आरोग्य मंथन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांची नियुक्ती झाल्याबद्दल कोकाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी मनोगतात नंदुरबार जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होतात, असे सांगितले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याची शपथ घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी, मंथन शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार असून, गटचर्चा करून त्यावर उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे नमूद केले.

शिबिराच्या प्रारंभी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिबिरात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती, आगामी योजना, मातृ मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न, ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याचे उपाय, टेलिमेडिसिनसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. विविध पथकांनी आरोग्यसेवांवरील कार्यपद्धतींबाबत सादरीकरण केले.