नंदुरबार – लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना नंदुरबार जिल्हा बुधवारी रात्री वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आला. जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याचा निरीक्षकच लाच घेताना जाळ्यात अडकला. कारवाईची माहिती मिळताच संतप्त जमावाने नवापूर पोलीस ठाण्यासमोरच लाचखोर निरीक्षकाविरोधकात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्याला घेवून जाणाऱ्या वाहनावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नवापूर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
नवापूर तालुक्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे हा कायमच वादग्रस्त राहिला आहे. गुजरात राज्यातील सोनगड पोलीस ठाण्यात नवापूर येथील एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुजरात पोलिसांचे पथक नवापूर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याने मध्यस्थी केल्याने संशयिताला अटक झाली नव्हती. त्या मोबदल्यात वारे याने संशयिताच्या मित्राकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावेळी संबंधितांनी भीतीमुळे पाच मार्च रोजी वारे यास एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर वारे याने दीड लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शविली. पंचासमक्ष मागणी केलेले ५० हजार रुपये स्वीकारताना वारे यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असतानाच वारे यास अटक झाल्याची माहिती नवापूरमध्ये पसरली. त्यानंतर रात्री नवापूर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी करुन वारेविरोधात घोषणाबाजी सुरु केली. वारे याने नवापूरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल केल्याचे तसेच अनेकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचे जमावाचे म्हणणे होते. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेवून रात्रीतून दुसऱ्या रस्त्याने वारे यास नंदुरबारमध्ये आणण्यात आले. यावेळी जमावाने त्यांना घेवून जात असलेल्या वाहनालाही घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर रात्री नवापूरमध्ये मोठी कुमक तैनात करण्यात आली.