नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १३ तारखेला मतदान होत असून मतदानाला ४८ तासांचा अवधी शिल्लक असतानाही अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या नर्मदा काठावरील मतदान केंद्रांसाठी पोलीस पथक शनिवारीच रवाना झाले.
नंदुरबार मतदारसंघ हा डोंगराळ तसेच नर्मदा नदीकाठाने व्यापलेला आहे. अनेक ठिकाणी अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. डोंगराळ भाग असल्याने अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात बहुतांश भागात भ्रमणध्वनीशी संपर्क होऊ शकत नाही. अशा भागांमध्येही मतदान केंद्रे असून अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहचताना कसरत करावी लागते.
मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर पोहचणे अधिक दिव्य मानले जाते. या केंद्रांवर पोहचण्यासाठी पथकाला रस्त्याने कित्येक किलोमीटरचा प्रवास आणि नंतर सरदार सरोवराच्या जलाशयातून होडीसदृश्य बार्जमधून जावे लागते. त्यामुळे मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी लागणारे अंतर पाहता या पाच मतदान केंद्रांसाठी अधिकारी, कर्मचारी, पोलीस पथकांना सर्वांत आधी रवाना केले जाते. मतदानासाठी ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना शनिवारीच या पाच मतदान केंद्रांसाठी पथक रवाना झाले.
हेही वाचा…राजसत्तेने धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये, शांतिगिरी महाराजांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
या पाच मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी सुरुवातीला १५० किलोमीटरचा प्रवास पथकांना गुजरातमधून करावा लागला. हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर केवडिया कॉलनीत पथके आल्यावर कॉलनीतून होडीसदृश बार्जद्वारे मतदान साहित्य घेवून पथके सरदार सरोवराच्या जलाशयातून मतदान केंद्रांकडे रवाना झाले. या पाच मतदान केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पहिले मतदार केंद्र असलेल्या मणिबेली केंद्राचा समावेश आहे. याशिवाय मुखडी, डनेल. बामणी आणि चिमलखेडी या मतदान केंद्रांवर देखील बार्जद्वारेच मतदान पथक पोहचणार आहे.