नाशिक – ताप्ती गंगा एक्स्प्रेसमध्ये साधारण बोगीत बसण्याच्या वादातून राजस्थानच्या दोन प्रवाशांवर नंदुरबार रेल्वे स्थानकात हल्ला करण्यात आला. जखमी प्रवाशांना नंदुरबार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईहून जोधपूरकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्स्प्रेसमधून राजस्थानमधील सुमेरसिंग सिंह (२६) आणि परबत परिहार (४०) हे दोघे साधारण बोगीतून प्रवास करत होते. चेन्नईच्या एग्मोर स्थानकातून ते जोधपूरसाठी निघाले होते. भुसावळ स्थानकात रेल्वेत चढलेल्या एका प्रवाशाशी बसण्याच्या जागेवरुन त्यांचा वाद झाला. त्या प्रवाशाने आपल्या काही मित्रांना भ्रमणध्वनीव्दारे नंदुरबार रेल्वे स्थानकात बोलावून घेतले.

ताप्तीगंगा एक्स्प्रेस दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी नंदुरबार रेल्वे स्थानकात आल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या मित्रांनी राजस्थानच्या दोन्ही प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. सुमेरसिंग यांच्या मांडीला तर परिहार यांच्या हातावर गंभीर जखम झाली. या वादाची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. दोघा जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे अर्धा ते पाऊण तास खोळंब्यानंतर ताप्तीगंगा जोधपूरकडे रवाना झाली. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल शेवाळे यांनी हल्लेखोरांनी वापरलेले धारदार शस्त्र जमा केले. यानंतर त्यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांनी नाकाबंदी करुन संशयितांचा शोध सुरु केला. जखमीपैकी सुमेरसिंग यांच्या मांडीची नस कापली गेल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. या हल्ल्यातील संशयितांना ताब्यात घेण्याचे आव्हान लोहमार्ग पोलिसांसमोर आहे.

Story img Loader