Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : नंदुरबार विधानसभा मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यात असून तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. भाजपा नेते विजयकुमार गावित हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९६२ पासून ते १९८० पर्यंतच्या प्रदीर्घ काळात या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र १९९५ नंतर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार मतदारसंघाला आपला बालेकिल्ला केला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करत राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजपा असा त्यांचा प्रवास आहे.

आमदार म्हणून अनेक वर्षांचा कामाचा अनुभव

२०१४ मध्ये विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या भाजपाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर विजयकुमार गावित यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे असून या माध्यमातून ते मतदारसंघातील वाड्या पाड्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. आमदार म्हणून अनेक वर्षांचा कामाचा अनुभव हा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना फायदेशीर ठरू शकतो. त्यांना तुल्यबळ उमेदवार उभे करून आपला बालेकिल्ला परत मिळवण्याचे आव्हान काँग्रेस पक्षासमोर असणार आहे.

घटलेले मतदान वाढवण्याचे आव्हान

विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील नंदुरबार आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांना इतर मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही. २०१९ मधील निवडणुकीत हिना यांना नंदुरबार मंतदारसंघात ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र २०२४ च्या निवडणुकीत हे मतदान निम्म्यावर आले. गावित यांचा पराभव, नंदुरबारमध्ये घटलेल्या मताधिक्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी या परिस्थितीचा संधी म्हणून फायदा उचलू शकते. विजयकुमार गावित यांच्यासमोर घटलेले मतदान वाढवण्याचे आव्हान असणार आहे.