नंदुरबार : जुलै २०२३ मध्ये खरेदी केलेल्या मुद्रांकावर थेट चार महिने जुना करारनामा करुन दाखविण्याचा प्रताप नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने केला आहे. याच करारनाम्यावरुन मालाचा पुरवठा होण्याआधीच मार्चमध्ये देयकाचा धनादेश काढल्याचे सिद्ध होत आहे. या सर्व प्रकरणात ठेकेदाराने थेट विभागाशी संगनमत करुन खोटे दस्ताऐवज तयार केले असतानाही संबंधित विभागाने साधलेले मौन सर्वांनाच चकीत करणारे आहे. त्यामुळेच फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या सौरकंदील पुरवठा ठेक्यात विभागाने श्री एंटरप्रायजेस या ठेकेदारावर दाखविलेल्या कृपादृष्टीवर लोकसत्ताने प्रकाश टाकल्यानंतर आता या प्रकरणात कागदपत्रांच्या आधारे धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सौरकंदील पुरवठा ठेक्यात जिल्ह्यातील १२ बालविकास प्रकल्पांना थेट ३१ मार्च रोजीच सौरकंदीलाचा पुरवठा होवून त्याच दिवशी कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी पोहोचून तीन विभागाकडून त्याचा प्रवास होवून त्याच दिवशी निघालेला धनादेश यात काळंबेरं असल्याचे स्पष्ट करण्यास पुरेसा ठरत आहे. या पुरवठ्याचा करारनामा १२ एप्रिल रोजी झाला असताना मग हा पुरवठा करारनाम्याआधी झालाच कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात घर कोसळून आजोबा-नातवाचा मृत्यू; जिल्ह्यात संततधार

ज्या ५०० रुपयाच्या दोन मुद्रांकावर हा पुरवठ्याचा करारनामा झाला, त्यातील एक मुद्रांक हा संबंधीत ठेकेदाराने १२ एप्रिल रोजी खरेदी केल्याने यात १४ अटी-शर्ती लिहून त्यावर १२ एप्रिल रोजी करारनामा पूर्ण झाल्याचे लिहून तो विभागाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. मात्र या करारनाम्याला जोडलेला दुसरा मुद्रांक थेट तीन जुलै २०२३ रोजी खरेदी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जुलै महिन्यात खरेदी झालेल्या मुद्रांकावर चार महिने जुना करारनामा झालाच कसा, असा प्रश्न पुढे येत आहे. लंबंधीत ठेकेदाराने या करारातून खोटे दस्त तयार केल्याचे स्पष्ट होत असतांनाही महिला बालकल्याण विभागाने केलेला कानाडोळा संशयाची सुई त्यांच्याकडेच फिरवित आहे. प्रक्रियेचे पालन करुन पुरवठा होणे बंधनकारक असतानाही श्री एंटरप्रायजेससाठी विभागाने केलेली ही सर्व घाई नेमकी कोणाच्या दबावात, असा प्रश्न पुढे येत आहे.

हेही वाचा : कावळेही आता व्यसनाधीन!

‘संबंधित करारनाम्याचे मुद्रांक पाहता त्यांच्यातील तारखांची तफावत ही या ठेक्या बाबत संशय निर्माण करणारी आहे, मुद्रांक खरेदीनंतर त्यावर चार महिने जुना करारनामा आणि त्याकडे विभागाने केलेले दुर्लक्ष संशयाच्या भोवऱ्यात असून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे’, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा गटनेता ॲड. राम रघुवंशी यांनी म्हटले आहे.