नाशिक – शहरात आगीचे सत्र कायम असून रविवारी दुपारी पेठ रस्त्यावरील राज्य परिवहन (एसटी वर्कशॉप) कार्यशाळेत लागलेल्या आगीत रिक्षा, मोटारीसह टेम्पो ट्रॅव्हलर अशा जवळपास ११ वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत अर्धा ते पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले. परिसरात महामंडळाच्या १०० हून अधिक बस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईत जमा केलेली शेकडो वाहने ठेवलेली आहेत. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री तपोवन तसेच संभाजीनगर रस्त्यावर प्लायवूडचे गोदाम आणि फर्निचर मॉलला आग लागण्याची घटना घडली होती. तपोवनातील आग नियंत्रणात आणण्यासाठी कित्येक तास प्रयत्न करावे लागले. रविवारी दुपारी पेठ रस्त्यावरील एसटी कार्यशाळा आवारात तसाच प्रकार घडून अनेक वाहनांचे नुकसान झाले. या जागेचा वापर महामंडळाकडून जुन्या बस ठेवण्यासाठी केला जातो. यालगत प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. या विभागाकडून विविध कारवाईत जप्त केली जाणारी वाहने कार्यशाळेच्या जागेत ठेवली जातात. अशी परिसरात हजारोंच्या संख्येने जुनाट वाहने आहेत. दुपारी अकस्मात परिसरात आग लागली. प्रारंभी काही रिक्षा त्यात सापडल्या. रिक्षांचे आच्छादन व आसन व्यवस्थेच्या कुशनमुळे आग भडकली. हे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अन्य काही वाहने आगीपासून दूर नेली. दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाचे जवान दोन बंबांसह घटनास्थळी दाखल झाले.
अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत आरटीओने जप्त केलेल्या नऊ रिक्षा, एक स्विफ्ट डिझायर आणि एक टेम्पो टॅव्हलर अशा ११ वाहनांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग नियंत्रणात अग्निशमन विभागाचे पंचवटी केंद्राचे संदीप कानडे, संतोष मेंद्रे, मनोहर गायकवाड, वाहन चालक विजय शिंदे, क. का वाघ केंद्राचे विजय पाटील, यश भागवत, शंतनू काळमेख, संकेत जुन्नरे आदी जवान सहभागी झाले होते.
हेही वाचा
कार्यशाळेच्या परिसरात हजारोंच्या संख्येने वाहने आहेत. आग पसरली असती तर, नियंत्रणात आणणे अवघड झाले असते. आगीवर लवकर नियंत्रण मिळाल्याने अनर्थ टळल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.