नाशिक – नाशिक लोकसभा निवडणूक निर्भय आणि दहशतमुक्त वातावरणात करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असताना शहरात गुन्हेगारी कृत्य वारंवार होत असून जुने नाशिक परिसरातील भद्रकालीत नऊ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला असून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भद्रकाली परिसरात याआधीही दोन ते तीन वेळा वाहने जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. त्यावेळी वैयक्तिक वादातून जाळपोळीचे प्रकार घडल्याचे तपासात उघड झाले होते. बुधवारी रात्री अमरधाम परिसरातील रस्त्यावर जहांगीर कब्रस्तान आहे. या परिसरातील शहा बाबा दर्गाजवळील नवाज अब्दुल शहा यांच्या घरासमोर त्यांच्या दुचाकीसह अन्य लोकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असतात. समाजकंटकांनी नऊ दुचाकी, तीन कार आणि एक मालमोटार या वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवली. वाहनांनी पेट घेतल्यानंतर समाजकंटकांनी पळ काढला. वाहनांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अज्ञातांनी कब्रस्तानजवळील एका घरावर पेटती बाटली टाकून घर जाळण्याचा प्रयत्नही केला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा – नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या २४ मेपासून परीक्षा

हेही वाचा – व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

याविषयी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माहिती दिली. अज्ञात व्यक्तीने वाहने जाळली असून त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर आले असताना शहरात गुन्हे घडत असल्याने नाशिककरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.