नाशिक : मुंबई ते नाशिक महामार्गावर रविवारी इगतपुरीजवळ मुंबईहून नाशिकच्या दिशेने एकाच मोटारसायकलवरुन तिघे जण जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल अडथळे तोडून पुढे जाणाऱ्या मालमोटारीवर पाठीमागून जाऊन आदळली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये समाधान भगत, सचिन पथवे (रा. धार्णोली, वैतरणा) यांचा समावेश आहे. भाऊ भगत (रा. खंबाळे) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक हरी राऊत, हवालदार विजय रुद्रे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : नाशिक: ऑनलाईन व्यवसाय शोधणे महागात; युवकाची २४ लाख रुपयांना फसवणूक
पोलिसांनी दोन्ही मयत व जखमीला टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्परतेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. मोटारसायकलवरील तिघेही महिंद्रा कंपनीचे कामगार असल्याचे समजते.