नाशिक – वातावरणात ऊन- पावसाचा खेळ सुरू असल्याने शहरात आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात ९४ हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर, महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी वेगवेगळ्या विभागांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
शहर परिसरात काही महिन्यांपासून डेंग्यूचा त्रास जाणवत आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात १९४ रुग्ण आढळले असताना जूनमध्ये त्यात ९४ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा कार्यक्षेत्रातील डास प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत किटकजन्य रोग नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्यासाठी डास नियंत्रण समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
हेही वाचा – नाशिक शिक्षक मतदारसंघात ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात
विभागाच्या वतीने जीवशास्त्रज्ञ डॉ. नितीन रावते यांनी विभागाच्या सध्याच्या कामकाजाची, किटकजन्य आजारांची आकडेवारी व त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या कार्यवाहीसाठी संबंधित इतर विभागांच्या समन्वयाची आवश्यकता मांडली. डास नियंत्रण समितीच्या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी मनपा कार्यक्षेत्रात डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे, शिक्षण विभागामार्फत सरकारी व खासगी शाळांमध्ये आरोग्य शिक्षण देणे, प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, खासगी प्रयोगशाळांमधील माहिती संकलित करणे, अशा सूचना दिल्या.
हेही वाचा – नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटपाच्या तक्रारी; १० संशयित ताब्यात
याविषयी डॉ. रावते यांनी माहिती दिली. आरोग्य विभागाकडून नियमितपणे फवारणी केली जात आहे. वेगवेगळ्या विभागांना डेंग्यू प्रतिबंधासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागालाही सहभागी करुन मुलांना डेंग्यू कसा होतो, काय काळजी घ्यावी, पाणी साठवू नये, डेंग्यू अळ्या होऊ नये, यासाठी काय खबरदारी बाळगाल, यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. जूनध्ये हे रुग्ण अधिक असून मलेरियाचा अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याचे डॉ. रावते यांनी नमूद केले.