नाशिक – ओझर येथे महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर दोन आठवड्याआधी झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या आराध्या शिंदे (नऊ) हिचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात याआधी मृत्यू झालेल्या अर्पिता शिंदेची आराध्या ही चुलतबहीण आहे.
ओझरजवळ महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक काही ठिकाणी सर्व्हिस रोडने, काही ठिकाणी एकाच मार्गिकेत वळविण्यात आली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन आठवड्यापूर्वी ओझरजवळ अपघात झाला होता. गडाख कॉर्नरजवळून घरगुती गॅस सिलेंडर भरलेली मालमोटार सर्व्हिस रोडने मालेगावकडे निघाली असता दुचाकीला धडक बसली. दुचाकीवरील अर्पिता प्रकाश शिंदे, तिची आई प्राजक्ता शिंदे आणि प्राजक्ताची पुतणी आराध्या दीपक शिंदे या तिघी खाली पडल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने मालमोटार थांबवली. परंतु, अर्पिता ही मागच्या चाकात सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा – मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग भूसंपादनास लवकरच सुरुवात, अधिकाऱ्याची नियुक्ती
हेही वाचा – इगतपुरी तालुक्यातील अपघातात कल्याणचे तीन जण ठार, दोन जखमी
प्राजक्ता आणि आराध्या या दोघींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री आराध्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातामुळे शिंदे कुटुंबावर दोन आठवड्यात दुसरा आघात झाला. आराध्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सध्या महामार्गाच्या कामामुळे आणि सर्व्हिस रोडवरील गतीरोधकांना सफेद पट्टे नसल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत असून महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिसरोडवर असणाऱ्या गतीरोधकांना सफेद पट्टे आणि रेडियम लावावेत, अशी मागणी होत आहे.