नाशिक – कौटुंबिक वादाचा राग मनात ठेवत मुलास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परीक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पवार हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा – परतीच्या पावसाचा वीज पुरवठ्याला फटका, गंगापूर रस्त्यावरील काही भाग २४ तास अंधारात
हेही वाचा – देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश
पवार हे लाचलुचपत प्रतिबंधकच्या अमरावती परीक्षेत्रात अपर अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. त्यांचे पत्नीशी वाद असून ते हरीविश्व गृह प्रकल्पातील त्यांच्या राहत्या घरात विभागणी करुन राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पवार हे पत्नी राहत असलेल्या सदनिकेजवळ जात आरडाओरड करु लागले. त्यांचा मुलगा अभिषेक (२५) याने घाबरुन पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने पवार यांचे घर गाठत त्यांना समज दिली. या प्रकारानंतर चिडलेल्या पवारने अभिषेक राहत असलेल्या खोलीत प्रवेश करुन त्यास मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर आपटले. गळा दाबला. जीव घेण्याची धमकी दिली. मारहाणीत अभिषेकच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच त्याला चक्कर आली. जखमी अभिषेकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात पवारविरुद्ध गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.