नाशिक – मराठी राजभाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मनसेच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता अभिजात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या १०० मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रयत्नांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्मान सोहळ्याचे अध्यक्षस्थान संत साहित्यांचे गाढे अभ्यासक डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर भूषविणार आहेत. मान्यवरांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, डॉ. प्रदीप पवार, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. साहित्यिक, लेखक, कवी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, कीर्तनकार, मराठी नवउद्योजक, शासकीय कर्तव्य बजावणारे तसेच व्यावसायिक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल १०० मराठीजनांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी विवेक उगलमुगले हे काव्यवाचन करणार आहेत. माजी नगरसेवक दिनकर पाटील, सलीम शेख, रतनकुमार इचम, अंकुश पवार, सुदाम कोंबडे उपस्थित राहतील. या सर्व कार्यक्रमांना मराठी भाषाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मनसेचे उपजिल्हाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी केले आहे.
शाळा, महाविद्यालयांमध्येही कार्यक्रम
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता भगूर येथील नूतन विद्यामंदिरात कुसुमाग्रज प्रतिमा पूजन व पुष्प वाटप कार्यक्रम मनसेचे भगूर शहराध्यक्ष सुमित चव्हाण यांच्यावतीने ठेवण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता जेलरोड येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय, लॅमरोड येथील भाटिया महाविद्यालयात कुसुमाग्रज प्रतिमापूजन, विद्यार्थ्यांना पुष्प व मिठाई वाटपाचा कार्यक्रम होईल. ११ वाजता क्रांती सार्वजनिक वाचनालय व कॅन्टोन्मेंट बोर्ड सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ संपदा भेट देण्यात येणार आहे.