नाशिक – इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असताना विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. कॉलेज रोडवर घुटमळणाऱ्या ६९ टवाळखोरांसह दुचाकीवर तिघांना घेऊन भ्रमंती करणारे, विना कागदपत्रे आणि अन्य कारणावरून २३ वाहनचालकांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली.

बारावी परीक्षेच्या काळात शाळा, महाविद्यालयांबाहेर टवाळखोरांची भ्रमंती वाढली आहे. अलीकडेच व्ही. एन. नाईक महाविद्या्लयाच्या बाहेर एकाने युवतीला मारहाण केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवली. कॉलेज रोड परिसरातील टवाळखोर आणि नियम धाब्यावर बसवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कारवाईचे सत्र हाती घेण्यात आले. परिसरातून ६९ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले. ११२ वाहनचालकांना अडवून तपासणी करण्यात आली. यात १३ दुचाकीस्वार तिघांना घेऊन मार्गक्रमण करत असताना पोलिसांच्या सापळ्यात सापडले. सहा वाहनचालकांकडे कुठलीही कागदपत्रे नव्हती. संबंधितांसह अन्य कारणास्तव चार अशा २३ वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी अकस्मात केलेल्या कारवाईमुळे टवाळखोरांसह वाहनचालकांची धावपळ उडाली. रस्त्यात वाहन तपासणी होत असल्याचे पाहून काही वाहनधारक चुकीच्या दिशेने माघारी वळले. कारवाई टाळण्यासाठी पळून जाणाऱ्या अशाच एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला धडक दिली. अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला. संबंधित महिला किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

Story img Loader