नाशिक : आडगाव शिवारात बांधकामाधीन प्रकल्पात कार्यरत शेकडो मजुरांमधून बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेशांतर केले. सलग चार दिवस या प्रकल्पांत मजूर, निरीक्षक (सुपरवायझर) म्हणून कार्यरत राहिले. भाषेतील फरक ओळखून अखेरीस आठ बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, उपनिरीक्षक शेरखान पठाण व किशोर देसले, हवालदार गणेश वाघ, पोलीस नाईक मनिषा जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आडगाव शिवारातील एका बांधकाम प्रकल्पात सुमारे ६०० मजूर काम करतात. त्यात काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेतील माळी यांना मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी सलग चार दिवस वेशांतर करुन नजर ठेवली. प़डताळणी केली. भाषेतील फरक लक्षात घेत खात्री पटल्यानंतर पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.
संशयितांमध्ये सुमन गाझी (२७), अब्दुला मंडल (२०), शाहीन मंडल (२३), लासेल शंतर (२३), आसाद मुल्ला (३०), आलीम मंडळ (३२), अलअमीन शेख (२२), मोसीन मुल्ला (२२) यांचा समावेश आहे. संशयित सुमन गाझी हा १२ वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्याच्यासह अन्य दोन जणांकडे आधारकार्ड आणि तत्सम कागदपत्रे आढळली. संशयितांकडून बांगलादेशीतील ओळखपत्र हस्तगत करण्यात आली. गाझीच्या संपर्कातून इतर संशयित भारतात आले. यातील तिघांनी बनावट कागदपत्रे तयार केली. यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा ओलांडण्यासाठी दलालाची मदत
बांगलादेशातील दलालाच्या माध्यमातून संशयितांनी सीमा ओलांडली. कोलकाता येथील दलालाने त्यांना इतरत्र पाठवले. रोजगारासाठी संशयितांनी अनधिकृतपणे देशात प्रवेश करून वास्तव्य केले. संशयितांचे कुटुंबिय बांगलादेशात वास्तव्यास आहे. हे मजूर भारतात पैसे कमावून ते कोलकातास्थित दलालाकडे पाठवतात. त्यांच्यामार्फत ते पैसे बांगलादेशात पाठविले जातात, असे प्राथमिक तपासात उघड झाले.
बांधकाम प्रकल्पांवर शोध मोहीम
शहरातील बांधकाम प्रकल्पांसह अन्यत्रही बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस विशेष मोहीम राबविणार आहेत. बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांनी मजूर, कामगारांना कामावर ठेवताना दक्षता बाळगण्याची गरज आहे. संबंधितांकडून सादर केली जाणारी कागदपत्रांची सत्यता पडताळण्याची आवश्यकता आहे. उपरोक्त प्रकरणात त्या अनुषंगाने तपास केला जाईल. तीन बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केली. यात स्थानिक पातळीवरून त्यांना कोणी मदत केली याचे धागेदोरे शोधून कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.