नाशिक : बंडखोरी…आरोप-प्रत्यारोप…धमक्या…पैसे वाटपावरून वाद…भाऊबंदकी, अशा विविध कारणांनी गाजलेल्या विधानसभा निवडणुकीत कुठे दुरंगी, तिरंगी वा चौरंगी अशा मुख्य लढती होत आहेत. एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केल्यामुळे सर्वत्र चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पालकमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ, सलग दोन आणि एकवेळा निवडून आलेल्या भाजपसह मित्रपक्षांच्या आमदारांचे भवितव्य या निवडणुकीत निश्चित होणार आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघात एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांसह काही ठिकाणी अभिनेतेही प्रचारात सहभागी झाले होते. सभा, संमेलने, मेळावे, फेरींमधून प्रचाराची राळ उडाली. शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक आजी-माजी केंद्रीय मंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत. आदित्य ठाकरे तर, राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी प्रचारात सहभाग नोंदविल्याने निवडणुकीत रंग भरले गेले. १४ मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होत असली तरी बंडखोरी, प्रबळ उमेदवारांमुळे ती तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी झाली आहे. काही मतदारसंघात नामसाधर्म्य साधणारे अपक्ष उमेदवार असून पिपाणीसदृश्य ट्रम्पेट चिन्ह असल्याने त्यांचा काही प्रभाव पडतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा…Maharashtra Assembly Election 2024 : मतदानावेळी फिरती पथके; केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त

देवळालीत महायुतीकडून अजित पवार गटाच्या सरोज अहिरे आणि शिंदे गटाच्या जयश्री अहिरराव हे दोन अधिकृत उमेदवार रिंगणात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे योगेश घोलप आहेत. चांदवड मतदारसंघात दोन भावांनी परस्परांविरोधात शड्डू ठोकले आहेत. महायुतीचे डॉ. राहुल आहेर, भाजपचे अपक्ष बंडखोर केदा आहेर आणि महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे प्रमुख उमेदवार आहेत. तशीच बंडखोरीची स्थिती नांदगावमध्ये आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ आणि महाविकास आघाडीचे गणेश धात्रक मैदानात आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंत गिते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात थेट लढत आहे. नाशिक पश्चिममध्ये महायुतीच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील तर नाशिक पूर्वमध्ये महायुतीचे राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे गणेश गिते यांच्यात मुख्य लढत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे भुसे विरुध्द महाविकास आघाडीचे अद्वय हिरे यांच्या लढाईत बंडूकाका बच्छाव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. मालेगाव मध्य मतदार संघात एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल, इस्लाम पक्षाचे असिफ शेख, काँग्रेसचे एजाज बेग आणि समाजवादी पक्षाच्या शान ए हिंद यांच्यात चौरंगी लढत होत आहे.

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात बुधवारी मतदान; ५० लाखहून अधिक मतदार, मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास बंदी

येवल्यात महायुतीचे छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे यांच्यात सरळ लढत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या येवला दौऱ्यामुळे या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. निफाडमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम या आजी-माजी आमदारांमध्ये पारंपरिक लढत आहे. कळवणमध्ये महायुतीचे नितीन पवार विरुध्द महाविकास आघाडीचे जे. पी. गावित, बागलाणमध्ये महाविकास आघाडीच्या दीपिका चव्हाण विरुध्द महायुतीचे दिलीप बोरसे यांच्यात सामना होत आहे. इगतपुरीत महायुतीचे हिरामण खोसकर, महाविकास आघाडीचे लकी जाधव, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार निर्मला गावित (अपक्ष) अशी चौरंगी लढत होत आहे. सिन्नरमध्ये महायुतीचे माणिक कोकाटे विरुध्द महाविकास आघाडीचे उदय सांगळे रिंगणात आहेत. अनेक जागांवर बंडखोर, अपक्ष मोठ्या संख्येने असल्याने काट्याची टक्कर होणार आहे. माघारीच्या मुदतीनंतरही काही अपक्षांनी माघार घेत अन्य राजकीय पक्ष वा उमेदवारांस पाठिंबा दिला. मात्र त्यांची नावे व चिन्ह मतपत्रिकेवर कायम आहेत.