केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक व नागपूर येथे हे मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील मार्केटसाठी सैय्यद पिंप्री येथील १०० एकर जागा नागपूरच्या धर्तीवर विनामूल्य मिळावी, यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होत असून लवकरच तो मार्गी लागणार आहे.
या बाबतची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. नाशिक टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागेची गरज आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने या प्रकल्पासाठी मौजे पिंप्री सैय्यद येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव २०१० पासून शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करत टर्मिनल मार्केटसाठी उपरोक्त जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली होती. या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर होणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. कृषिमालाचे नुकसान कमी करण्याबरोबर मध्यस्तांची साखळी कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून सुमारे ६० कोटींच्या खर्चाचे नाशिक टर्मिनल मार्केट सार्वजनिक व खासगी भागीदारीतून करण्यात येणार आहे. या प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक लिलावगृह, हाताळणी यंत्रणा, प्रतवारी, पॅकिंग, बँँकिंग, प्रक्रिया व निर्यात सुविधा अंतर्भूत राहणार आहेत. या मार्केटमध्ये ७० टक्के फळे व भाजीपाला, १५ टक्के अन्नधान्य, १५ टक्के मांस, दुग्धजन्य पदार्थाची हाताळणी अपेक्षित आहे. फळे व भाजीपाल्यासाठी स्वतंत्र शीतगृहांची साखळी स्थापन करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा