नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेसह या ठिकाणची वाढती गुन्हेगारी लक्षात घेत एमआयडीसी पोलीस ठाणे करावे, गायरान जमीन भूखंड घोटाळ्याची चौकशी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी अंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाशिक- मुंबई असा मोर्चा काढला आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी निघालेला मोर्चा सात दिवसानंतर मंत्रालयावर धडकणार आहे, या मोर्चात अंबडचे २०० ते २५० शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. मोर्चाला सुरुवात झाल्यावर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा…नाशिक : नॅबतर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत उपकरणांची व्यवस्था
अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र एमआयडीसी पोलीस ठाणे करावे, भूखंड घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीव्दारे चौकशी करावी, एमआयडीसीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व समस्या तत्काळ सोडवाव्यात, अंबडच्या कारगिल चौक भागात गुन्हेगारी वाढल्याने या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी करावी, औद्योगिक वसाहतीसाठी कंपन्यांमध्ये स्वतंत्र सांडपाणी केंद्र कार्यान्वित करावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गायरान जमिनीचा मोबदला द्यावा, यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
हेही वाचा…नाशिक : निफाड तालुक्यात गोदावरीला पानवेलींचा विळखा
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात प्रभाकर दातीर, काशिनाथ दातीर, चंद्रकांत दातीर, बारकु दातीर, उत्तम दातीर, विठ्ठल जमधडे यांसह २५० शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास नाशिक-दिल्ली ट्रॅक्टर फेरी काढून राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी सांगितले.